बॉलीवूड कलाकारांनी ‘जागतिक तंबाखूरहित दिना’निमित्ताने जनजागृतीचा वसा घेत केले जनतेला आवाहन...

तंबाखूचे सेवन हे मृत्यूच्या अनेक कारणांपैकी हे महत्वाचे कारण आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी साधारण ६० लाख लोक मृत्यूमुखी पडतात. त्यातील सहा लाख लोकांचा मृत्यू हा ते धूम्रपान करत नसूनही इतरांच्या धुम्रपानामुळे ओढवतो. त्यामुळे धुम्रपानावर बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच धुम्रपान करणाऱ्यांना धुम्रपानापासून परावृत्त करण्याची गरज बोलून दाखवत ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए) कडून ‘जागतिक तंबाखूरहित दिना’पासून तंबाखू सोडण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. तसेच यंदाचे ‘तंबाखू आणि फुफ्फुसांचे आजार’ याविषयी जनजागृतीचे धोरण जाहीर करण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर दरवर्षी साधारण ६० लाख लोक मृत्यूमुखी पडतात. आपण याबाबत योग्य ती पावले उचलली नाहीत तर २०३०पर्यंत ८० लाख लोक या कारणामुळे मृत्युमुखी पडतील. यातील ८० टक्के हे गरीब आणि मध्यमवर्गीय देशांमधील असतील. असे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनकडून सांगण्यात आले. ही संस्था गेली ५० वर्ष जनजागृती मोहीम राबवत आहे.

‘जागतिक तंबाखूविरोधी दिना’च्या निमित्ताने तंबाखूचा नागरिकांच्या फुफ्फुसावर होणारा दुष्पपरिणाम; त्यापासून होणारे कर्करोग ते दुर्धर श्वसनरोग आणि फुप्फुसाचा मानवी आरोग्य व मानव कल्याण यांमधील भूमिका या विषयांवर ही जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. यंदाच्या उपक्रमात सर्व भर हा जनजागृती निर्माण करणे आणि तंबाखू नियंत्रण उपक्रम राबविणे तसेच कर्करोग रुग्णांसाठी निधी संकलन करणे या गोष्टींवर राहणार आहे, असे पत्रकार परिषदेत कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनकडून सांगण्यात आले. या मोहिमेला पाठींबा देण्यासाठी प्रख्यात निर्माती-दिग्दर्शिका फरहा खान, संगीतकार शंकर-एहसान-लॉय, माजी खासदार प्रिया दत्त, निर्माते रघु राम, गायक अभिजीत सावंत, श्रीराम अय्यर आणि ग्वेन डायस यांनीही हजेरी लावली होती. तंबाखूजन्य पदार्थांचे होमकुंडात हवन करून या सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात केली. ३० जून रोजी ताज लँड्स एंड, वांद्रे येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक तंबाखूरहित दिनाची सुरुवात पहिल्यांदा १९८८ मध्ये झाली आणि त्यानंतर दरवर्षी ३१ मे रोजी हा दिन साजरा केला जातो. हा एक जागतिक उपक्रम असून तंबाखू सेवनाचे जनसामन्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच तंबाखूचा वापर वापर कमी करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले जाते. यंदाची संकल्पना ही तंबाखू आणि फुफ्फुसाचे रोग ही आहे. या मोहिमेमधून तंबाखूसेवनामुळे लोकांच्या फुफ्फुस आरोग्यावर होणारा परिणाम यांवर जनजागृती केली जाईल. तंबाखूसेवनामुळे कर्करोग ते दुर्धर श्वसनरोग उद्भवतात त्यांबाबत तसेच लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत आणि मानवी कल्याणाच्या दृष्टीने फुफ्फुसाचे कार्य, यावरही या मोहिमेत जागृती केली जाणार आहे.

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए)ने केलेल्या सर्वसमावेशक सर्वेक्षणांमध्ये तब्बल तीन हजार रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय गेल्या चार महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी २०१९ पासून मुंबईत रिक्षाचालकांसाठी तपासणी शिबिरे घेण्यात आली. ‘तंबाखूरहित ऑटोरिक्षा’ या उद्दिष्टाने ही मोहीम राबविली गेली. “या शिबिरे तसेच सर्वेक्षणांदरम्यान तब्बल ८५ टक्के चालक हे तंबाखूसेवन करतात असे आढळून आले आहे. कुर्ला, सांताक्रुझ, बोरीवली आणि मालाड येथील शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या चालकांमध्ये तब्बल ४५ टक्के चालकांमध्ये कर्करोग संबंधित लक्षणे दिसून आली,” असे उद्गार सीपीएएच्या कार्यकारी संचालिका श्रीमती अनिता पीटर यांनी काढले.

सीपीएएच्या तपासणी शिबिरानंतरच्या समुपदेशनानंतर पाच रिक्षाचालकांनी तंबाखूची सवय सोडून  दिली असून तसे जाहिरपणे सांगितले आहे. रामकुमार सहाय, सुरेश गुप्त, अनिल शर्मा, वीरेंद्र कुमार एस गुप्ता आणि कृष्णकुमार आर मिश्रा अशी या चालकांची नावे असून त्यांना एका पत्रकार परिषदेत सन्मानित करण्यात आले. तंबाखूमुक्त रिक्षा हे अभियान मुंबईत राबविण्यात येणार आहे.
सीपीएएचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री वाय के सप्रू म्हणाले, “'जागतिक तंबाखूरहित दिन २०१९'च्या निमित्ताने धोरणे बनविणारे अधिकारी आणि सर्वसामान्य लोक यांना तंबाखू उद्योगाच्या धोकादायक पद्धती आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती व ज्यांचा कल धुम्रपानाकडे आहे, असे युवक यांच्यामध्ये काम केले जाणार आहे. त्यातून हा रोग आणि त्यामुळे ओढवणारा मृत्यू यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. कर्करोग रुग्णांमध्ये गेली ५० वर्षे सीपीएए कार्यरत असून त्या माध्यमातून आम्ही तब्बल ३०० मौखिक आणि फुफ्फुस कर्करोग रुग्णांना दरवर्षी मदत करत आलो आहोत.”

शंकर-एहसान-लॉय या संगीतकार चमूने म्हटले, "कॅन्सर पेशंट्स एड असोसिएनबरोबर कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी कार्यक्रमात सहभागी होण्याचे हे चौथे वर्ष आहे. अशाप्रकारच्या उपक्रमात सहभागी होताना आम्हाला नेहमीच आनंद होतो कारण अशा कार्यक्रमामुळे समाजात बदल घडून येऊ शकतो. जिथे शक्य असेल तिथे आपले योगदान देण्याचा व त्यातून समाजिक ऋण फेडण्याचा आमचा प्रयत्न असतो. संगीत हे जनजागृतीचे एक उत्तम माध्यम आहे. संगीताच्या माध्यमातून ज्या रुग्णांचा आवाज तंबाखूमुळे गेला आहे त्यांच्यासाठी निधी संकलन करणे अधिक सोयीस्कर असते."

Comments