Sana Kedar Shinde will be seen as Shahir's wife in the biopic "Maharashtra Shahir" on Shahir Sable!

शाहीर साबळेंवरील "महाराष्ट्र शाहीर" या चरित्रपटामध्ये शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार सना केदार शिंदे!

 

मुंबई: 'जय जय महाराष्ट्र माझा...’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज म्हणजे ३ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत आहे. त्यांचा नातू केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या शाहिरांच्या जीवनपटामध्ये आणखी एक दुर्मिळ आणि अभूतपूर्व असा योग जुळून आला आहे. नातावाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची आणि प्रख्यात कवयित्री भानुमती यांची भूमिका कोण करत आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. तर ही भूमिका करतेय शाहिरांची पणती आणि केदार शिंदे यांची मुलगी सना केदार शिंदे!

‘महाराष्ट्राचे शाहीर’ अशी ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर २०२२ ते ३ सप्टेंबर २०२३दरम्यान साजरे होत आहे. शाहिरांच्या जीवनावरील चरित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होत आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा...' या महाराष्ट्र गीतासह ‘महाराष्ट्र भूमी बहुगुणी...शोभते खणी, किती नरमणी...’, 'या गो दांड्यावरून....', 'जेजुरीच्या खंडेराया जागराला या या....' अशी दर्जेदार लोकगीते देणाऱ्या या शाहिरांची भूमिका आघाडीचा नायक अंकुश चौधरी करत आहे. शाहिरांच्या यशामध्ये त्यांची पत्नी भानुमती यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गायलेली अनेक लोकगीते भानुमती यांनी लिहिली होती. त्यांचीच महत्त्वाची भूमिका सना केदार शिंदे करत आहे.

म्हणजे नातवाने आजोबांवर चित्रपट करण्याचा दुर्मिळ योग जसा या चित्रपटातून जुळून आला आहे, तसाच किंवा अधिक दुर्मिळ असा पणतीने पणजीची भूमिका करण्याचा योगही  ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये जुळून आला आहे. ही चित्रपटसृष्टील कदाचित एकमेव घटना असावी.

‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे. या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पुढे येतील.

लहानपणापासूनच सामाजिक चळवळींशी जोडले गेलेल्या कृष्णराव अर्थात शाहीर साबळे यांनी १९४२ची चले जाव, स्वातंत्र्यानंतरचा गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम तासेच संयुक्त महाराष्ट्र अशा चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. लोककलेच्या क्षेत्रातील मोलाच्या योगदानबद्दल या महान कलावंताचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. सातारा येथील पसरणी येथे ३ सप्टेंबर १९२३ रोजी जन्मलेले शाहीर साबळे जेमतेम सातवीपर्यंत शिकले होते.

चित्रपटाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, “माझे आजोबा म्हणजे शाहिर साबळेंच्या आयुष्यात आणि यशात त्यांची पत्नी माझी आजी भानुमती यांचे योगदान अद्वितीय असेच होते. शाहिरांच्या आयुष्यातील गोड गाणे म्हणजे भानुमती. त्यामुळे भानुमातीची भूमिका माझी मुलगी करत आहे, हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होतोय, अभिमान वाटतोय. नातू म्हणून मला शाहीर मोठे वाटतातच, पण एक कलाकार म्हणूनही मला त्यांचे जीवन खूपच मोठे वाटते. शाहिरांचा जीवनपट या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचे काम गेली अडीच वर्षे सुरू आहे. आपले कलाकार किती मोठे होते, आपल्या मातीतून हे कलाकार कसे घडले, त्यांनी यश कसे मिळवले, यश मिळवणे एवढे सोपे असते का, अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे नव्या पिढीला या चित्रपटाच्या माध्यमातून मिळतील.”



Comments