५ जानेवारी पासून मुंबईमध्ये रंगणार बहुप्रतिक्षित माणदेशी महोत्सव
मुंबई: यंदा दोन वर्षानंतर "माणदेशी महोत्सव" पुन्हा मुंबईमध्ये परतला आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर बहुप्रतिक्षित असा हा पाचवा 'माणदेशी महोत्सव' यंदा ५ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. ५ जानेवारी सकाळी १०:३० वाजता होणार आहे. साताऱ्यातील माण तालुका, एक दुष्काळग्रस्त भाग. दुष्काळामुळे शेती नाही, हाताला काम नाही. परिणामी परिस्थितिशी दोन हात करावे लागतात मात्र माणदेशी भगिनींच्या आयुष्यात चेतना सिन्हा या माणदेशी फ़ाऊंडेशनच्या रुपाने आल्या आणि संपूर्ण कायापालटच झाला. त्यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पातून महिलांना स्वयंरोजगार गवसला. माणदेशी भगिनी उद्योग-व्यवसाय करु लागल्या. पण तयार केलेल्या उत्पादनाची बाजारपेठ शहरात कशी मिळवावी? त्यातूनच जन्मास आला 'माणदेशी महोत्सव'.
माणदेशातील महिलांना त्यांच्या औद्योगिक कौशल्याशी निगडीत यंत्रमागावर काम करण्यास शिकवण्यात आले जेणेकरुन मोठ्या प्रमाणावर उत्पादननिर्मिती कशी करावी याचे प्रशिक्षण देण्य़ात आले, ज्यामुळे तब्बल ७ हजार महिलांनी माणदेशी फ़ाऊंडेशनने उपलब्ध करून दिलेली स्वयंरोजगारासाठीची यंत्रे विकत घेतली. यापैकी कित्येक महिलांना १०-२० हजार रुपयांची छोटी कर्जे माणदेशी महिला सहकारी बॅंकेने उपलब्ध करुन दिली. शेतकऱ्यांचा शेतमाल ग्राहकांकडे पोहोचेपर्यंत अनेक माध्यमामधून जातो. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतात तर शेतकऱ्याला कवडीमोलाचा भाव मिळतो. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्य़ासाठी माणदेशी फाऊंडेशनने शेतकऱ्यांना मदत केली. त्याचसोबत दोन प्रकारचे गूळ पावडर आणि डाळी यांचे ब्रॅण्ड्स तयार केले. या सगळ्या महिला व शेतकरी अद्ययावत प्रशिक्षण घेऊन माणदेशी महोत्सवाला मुंबईकरांच्या भेटीला येत आहेत.
यंदाच्या महोत्सवात प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी आपली कला सादर करणार आहेत. माणदेशी चॅम्पीयन महिला कुस्ती त्याचबरोबर माणदेशी लोकनृत्याचा प्रकार असलेले "गझी नृत्य" पाहण्यास देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे १० लाख महिलांचा परिवार असलेल्या माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनी आपल्या संघर्षगाथा माणदेशीच्या व्यासपीठावरुन उलगडणार आहेत.
यासोबत या महोत्सवात आपण स्वतः कुभांरकाम करण्याचा आनंद घेऊ शकता, स्वत: उभं राहून लाटणं तयार करुन घ्या, लाखेच्या बांगड्या बनवून घ्या, टोपली किंवा झाडू वळवून घ्या, ही सारी काही गावातली संस्कृती येथे अनुभवता येणार आहे. जर तुम्ही खवय्ये असाल तर साताऱ्याचा खर्डा, शेंगदाण्याच्या चटणीसह वेगवेगळ्या चटण्या, लोणची, ज्वारीची भाकरी, कुरड्या, मासवड्या, साताऱ्याचे जगप्रसिद्ध कंदी पेढे तुमच्या प्रतिक्षेत आहेत त्याच बरोबर साताऱ्याची प्रसिद्ध जेन घोंगडी विसरुन चालणार नाही, या महोत्सवात तुम्ही ही खरेदी करु शकता.
तेव्हा माणदेशी महोत्सवाला भेट द्या. तुमच्या भेटीसाठी माणदेशी भगिनी व शेतकरी उत्सुक आहेत. ५, ६, ७, ८ जानेवारी दरम्यान सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत कधीही भेट देता येणार आहे. हा महोत्सव सर्वासाठी मोफत आहे.
आपल्या माणदेशी भगिनींना प्रोत्साहीत करण्य़ासाठी माणदेशी महोत्सवास आवर्जून भेट द्या, असे आवाहन माणदेशी फ़ाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी मुंबईकरांना केले आहे.
"माणदेशी महोत्सव २०२३" - ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा महोत्सव
चार दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा:
गुरुवार, ५ जानेवारी – पहिला दिवस - उद्घाटन सोहळा – १०.३० वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते. गझी लोकनृत्य सादरीकरण – सायंकाळी ६.०० वाजता.
शुक्रवार, ६ जानेवारी – दुसरा दिवस – प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी यांचे भारुडाचे सादरीकरण – सायंकाळी ६.०० वाजता.
शनिवार, ७ जानेवारी – तिसरा दिवस - महिला कुस्ती स्पर्धा, सायंकाळी ६.०० वाजता.
रविवार, ८ जानेवारी – चौथा दिवस - माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनींची संघर्षगाथा सादरीकरण, सायंकाळी ६.००वाजता.
रात्री ९.३० वाजता माणदेशी महोत्सवाची सांगता.
Comments
Post a Comment