The Marathi movie 'Marathi Paul Padte Pudhe' will be released everywhere on May 5

'मराठी पाऊल पडते पुढे' मराठी चित्रपट ५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार

महाराष्ट्र: "मराठी पाऊल पडते पुढे"... ह्या ओळीत प्रचंड उर्जा आहे. गाणे असो वा शीर्षक ऐकल्यावर मराठी मन आणि मनगटात ती उर्जा संचारते. कला, क्रीडा, साहित्य, उद्योग-व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक मराठीजणांनी जगाच्या नकाशावर आपली पताका फडकवली आहे. पण, तरीही मराठी माणूस म्हटलं की सण-वार-उत्सवात रमणारा अल्पसंतुष्ट नोकरदारवर्ग किंवा व्यावसायिकता, उद्यमशीलता आणि व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्य करण्याची वृत्ती नसणारे, असा एक ढोबळ समज आहे. अर्थात, त्याला अनेक कारणं असू शकतात.

 

निर्माता प्रकाश बावीस्कर यांच्या शिवलाईन फिल्म्सची निर्मिती-प्रस्तुती असलेला आणि अकात फिल्म्सच्या चंद्रकांत विसपुते यांची सहनिर्मिती असलेल्या "मराठी पाऊल पडते पुढे" ह्या चित्रपटाने मराठी माणसाच्या स्वयंसिद्धतेसाठी प्रगतीच्या दिशेने केलेली वाटचाल अधोरेखित केली आहे. अर्थात, ही वाट ध्येयापर्यंत नेणारी असली तरी त्यात येणारी वळणे-खाचखळगे पार करण्यासाठी संघर्ष हा आहेच. पण, तिथे हिंमत न हारता कमी-अधिक वेगाने सात्यताने कसे मार्गक्रमण करावे आणि जोपर्यंत निश्चित ध्येय साध्य होत नाही तोवर अथक प्रयत्न कसे करावेत, ह्याचा उत्तम वस्तुपाठ ह्या चित्रपटाच्या निमित्ताने अतिशय मनोरंजक पद्धतिने घालून दिला आहे. ह्या जबरदस्त पावरपॅक चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रकाशित करण्यात आला. खान्देशातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पण संघर्षातून अन्यायाशी दोन हात करत व्यावसायिक बनणाऱ्या तरुणाची ही यशोगाथा आहे.

 

मराठी मालिका विश्वातून थेट "83" ह्या बॉलीवूडपटात झळकलेला, स्टार क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव अभिनेता चिराग पाटील ह्या चित्रपटाचा मुख्य नायक आहे. अमराठी व्यावसायिकांची मक्तेदारी मोडीत काढत उद्योग उभारणाऱ्या एक ध्येयवेड्या, रांगड्या नायकाची भूमिका त्याने साकारली आहे. त्याच बरोबर गोव्याच्या किनाऱ्यावर रुपेरी वाळूत सोनेरी लाटांवर स्वार झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणेसह अनंत जोग, सतीश पुळेकर, संजय कुलकर्णी, सतीश सलागरे आदि कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. लेखन-दिग्दर्शन स्वप्नील मयेकर यांचे असून नंदलाल चौधरी यांनी छायाचित्रण केले आहे.

 

स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी आजचा मराठी तरूण कुठेही कमी नाही. फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची गरज आहे. आणि ही गरज, प्रेरणा आणि उर्जो मनोरंजनाद्वारे देण्यासाठी "मराठी पाऊल पडते पुढे" हा चित्रपट ५ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

 

Comments