धमाल मराठी चित्रपट ‘गडबड झाली’चा मुहूर्त संपन्न




मराठी चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक वेगळे प्रयोग मराठीत होत आहेत. नुकेच फिल्मसिटीत एका साहसी पाठलाग दृश्याच्या चित्रिकरणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, या दृश्याच्या चित्रीकरणाने मराठी चित्रपट गडबड झालीचा मुहूर्त झाला. प्रांजली फिल्म प्रॉडक्शन्सची निर्माती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संतराम यांचे असून याचे निर्माते डॉ. जितेंद्र राठोड आहेत. सहनिर्माते रमेश रोशन यांनी चित्रपटाला संगीत दिले असून अजय सिंह मल्ल निर्मिती सूत्रधार आहेत.

या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे राजेश शृंगारपुरे, विकास पाटिल, मोहन जोशी, नेहा गद्रे, उषा नाडकर्णी, संजय मोहिते, अक्षता पाटिल अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. गडबड झाली चित्रपटाच्या नावावरूनच प्रेक्षकांना कल्पना येईल कि हा चित्रपट गोंधळात गोंधळ स्वरूपाचा आहे. कोणालाही आपलेसे वाटेल असे हे शीर्षक असून हा एक रोमटिक कमेडी चित्रपट आहे. अर्थात केवळ विनोद निर्मिती हा या चित्रपटाचा उद्देश्य नसून त्याबरोबरीने एक सद्य सामाजिक समस्येवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

सध्या मुलींनी पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढते आहे, पण हे प्रेमविवाह जास्त काळ टिकत नाहीत, याची कारणे काय असतील यावर हा सिनेमा प्रकाश टाकतो. पळून गेलेल्या मुलींना कशाचा सामना करावा लागतो, ते या चित्रपटात सादर होते. हिंदी  मालिकांमध्ये लक्षणीय ठसा उमटवलेल्या दिग्दर्शक संतराम यांच्या मते चित्रपटाच्या मराठी चित्रपट  दिग्दर्शित  करणे  आव्हानात्मक आहे, पण तगड्या स्टारकास्टमुळे ते सहज साध्य  झाले आहे. प्रेक्षकांना  गडबड झाली हा चित्रपट नक्की आवडेल असा त्यांना विश्वास आहे.


Comments