‘कृतांत’मध्ये एका वेगळ्याच रूपात संदिप कुलकर्णी

काही कलाकार कायमच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. मराठीसह हिंदीतही ज्याच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजतं तो अभिनेता संदिप कुलकर्णीही याबाबतीत आघाडीवर आहे. सिनेमातील भूमिका कोणतीही असो, त्यासाठी पडेल ती मेहनत घ्यायला संदिप नेहमीच तत्पर असतो. त्यामुळेच संदिपची भूमिका असलेल्या सिनेमांकडून प्रेक्षकांच्याही अपेक्षा वाढतात. आता ‘कृतांत’ या सिनेमात संदिप पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे.

‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. ‘कृतांत’चं कथानक आजच्या लाइफस्टाइलवर आधारित आहे. भंडारे यांनी या चित्रपटात वर्तमान काळातील दैनंदिन जीवनाची सांगड जगण्याच्या तत्त्वज्ञानाशी घालत एक अनोखी कथा सादर केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या धावपळीच्या व्यावहारीक जीवनातील तात्विकतेचा संबंध अधोरेखित करण्यात आला आहे.

संदिपच्या जोडीला या सिनेमात सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांच्या भूमिका आहेत. विजय मिश्रा या सिनेमाचे डीओपी आहेत. संगीतकार विजय नारायण गावंडे यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिलं आहे. दत्ताराम लोंढे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Comments