'नशीबवान' भाऊंची भिरभिरणारी नजर प्रदर्शित...

मराठी सिनेसृष्टीतील कॉमेडीचे बादशाह भाऊ कदम यांच्या 'नशिबवान' चित्रपटातील 'ब्लडी फुल जिया रे' हे गाणं आणि चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. असं असतानाच, आता या चित्रपटातील 'भिर भिर नजर' हे दुसरं गाणं प्रदर्शित झालंय. हे उत्स्फूर्त गाणं अवधूत गांधी यांनी गायलं असून सोहम पाठक यांनी या गाण्याला संगीतबद्ध  केलं आहे. तर या गाण्याचे बोल शिवकुमार ढाले यांनी लिहिले आहेत.

या गाण्याचे बोल आणि चित्रीकरण अप्रतिम आहे. वेगळ्या धाटणीचं असणारं हे गाणं भाऊंच्या कौटुंबिक आयुष्यात येणाऱ्या सुखद क्षणांचं दर्शन घडवतंय. एका सर्वसामान्य कुटुंबात होणारा हा बदल नक्कीच आनंददायी आहे. भाऊ आणि त्यांचं कुटुंब या गाण्यात हे भौतिक सुख भरभरून उपभोगताना दिसत आहेत. या गाण्याचं चित्रीकरण रहदारीच्या ठिकाणी आणि अतिशय सहजरित्या करण्यात आलं आहे, त्यामुळे ते अतिशय वास्तववादी वाटत आहे. हे धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच अधिराज्य गाजवेल.

लँडमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील यांनी निर्मात्यांची  धुरा सांभाळली असून प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप - वराडकर, नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे आदींचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

Comments