‘मनातल्या मनात’ मधून सोनाली कुलकर्णी - सिद्धार्थ चांदेकरचे वेबसिरीजमध्ये पदार्पण

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या वेगवेगळ्या रुपात मराठी प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. आता हिच सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर, हे दोघेही कॅफेमराठी निर्मित आणि शेमारूमी प्रस्तुत ‘मनातल्या मनात’ या मराठी वेबसिरीज मधून डिजिटल विश्वात पदार्पण करत आहेत. शेमारूमी या मोबाईल अ‍ॅपवर आणि वोडाफोन प्लेवर ही वेबसिरीज बघता येणार आहे. शिरीष लाटकर लिखित, संदीप मनोहर नवरे दिग्दर्शित ही वेबसिरीज तरुणांसाठी मनोरंजनाची खुसखुशीत मेजवानी ठरणार आहे.

सिनेमातून आपण नेहमीच या कलाकरांना भेटत असतो, परंतु आता सारे विश्व मोबाईलवर एकवटले असतांना त्यात हे मराठी कलाकार मागे कसे राहणार? ‘मनातल्या मनात’ ही हळूवार फुलत जाणारी रोमँटिक अशी गोष्ट आहे. लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटणाऱ्या अभिषेक आणि शिवानीची ही गोष्ट सर्वसामान्य प्रेक्षकांना आपल्या आयुष्यात डोकायला लावणार आहे. मराठी कुटुंबात लग्नासाठी चार-चौघात भेटून एकमेकांना समजून घेण्याऐवजी दोघेही एकांतात भेटून ऐकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु गोष्ट एवढीच नाहीये. त्यांच्यासोबत या भेटीत अजूनही कुणीतरी आहे, ते कोण आहेत? का आहेत ? पुढे त्या दोघांचे काय होते ? यासाठी तुम्हाला ‘मनातल्या मनात’ खुल्या मनाने बघावी लागणार आहे.

या सिरीजचे क्रीयेटर आणि कॅफेमराठीचे फाउंडर निखिल रायबोले म्हणाले कि, कॅफेमराठी तर्फे आम्ही सतत प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्या वेळी पहिल्यांदाच मराठी डिजिटल वर रोमांटिक आशयावर काहीतरी वेगळं असं बघायला मिळणार आहे. अरेंज मॅरेजच्या आधीच्या ५ भेटी, त्या मध्ये काय घडू शकतं, कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते असं बरच काही बघायला मिळणार आहे. ही गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांची आहे आणि अपेक्षा आहे कि ही तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.
मराठी गोष्टी आणि मराठी आशय नेहमीच दर्जेदार राहिला आहे, म्हणूनच हा विषय प्रभावीपणे आणि मोठ्या व्यापक स्तरावर प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी शेमारूमी ने पुढाकार घेऊन याची प्रस्तुती केली आहे. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघेही तेवढेच उत्सुक आणि उत्साही आहेत, कारण दोघांची ही पहिलीच वेबसिरीज आहे. विषय आणि त्याचे सादरीकरण दोघेही आवडल्याने दोघांनी ही वेबसिरीज करण्यासाठी होकार दिला. मराठी प्रेक्षकांना ही वेबसिरीज आवडेल असा आशावाद देखील दोघांनी व्यक्त केला.

Comments