‘चिरायू’च्या मंचावर पडद्यामागील कलाकर्मींचा सन्मान...

"गुढीपाडवा" हा सण निर्मितीचा सृजणाचा आहे. या आरंभदिनाच्या पूर्वसंध्येला नवोन्मेषाचा हा आनंद साजरा करण्यासाठी मराठी कलाकार दरवर्षी एकत्र येत "चिरायू" दणक्यात साजरा करतात. 'शेलार मामा फाऊंडेशन'च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चिरायू’ चे वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या अनेक कलाकर्मींची दखल ‘चिरायू’ च्या मंचावर आवर्जून घेतली जाते.

यंदाही अशाच ज्येष्ठ कलाकर्मींची दखल घेत मराठी कलाप्रांतात आपले भरीव योगदान देणाऱ्या पडद्यामागच्या कलाकर्मींचा सन्मान ‘चिरायू’तर्फे यंदाच्या वर्षी करण्यात येणार आहे. त्यात नाट्यसृष्टीसाठी गेल्या २० वर्षापासून ‘कपडेपटा’ची जबाबदारी सांभाळणारे कैलास कळंबे, ‘प्रॉपर्टी’ची व्यवस्था पाहणारे शेखर कदम, ‘फोकस पुलर’ म्हणून कार्यरत असणारे विजय डिकवलकर, ४० वर्षाहून अधिक काळ ‘नाट्य निर्मिती प्रमुख’ म्हणून काम करणारे भालचंद्र नाईक या ज्येष्ठ कलाकर्मींचा समावेश आहे. ‘चिरायू’ चे सर्वेसर्वा अभिनेता सुशांत शेलार यांनी ही माहिती दिली आहे.

यंदाही "चिरायू ‘२०१९" हा सोहळा गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवार ५ एप्रिलला मुंबईत रंगणार आहे. शेलार मामा चषक फाउंडेशन, प्लॅनेट मराठी, समर्थ व्हिजन, मराठी बाबा, मुंबई बीट्स, वीणा ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य या सोहळ्यास लाभले आहे.

Comments