श्वेतांबरी घुटेचे ‘सावट’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण...

श्वेतांबरी घुटे
चित्रपटाच्या लीड रोलसाठी एखादं चर्चेतलं नाव असा हा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळत होता. आता मात्र चित्रपटाच्या लीड रोलमधून प्रेक्षकांसमोर नवीन चेहरे दिसू लागले आहेत. अलीकडच्या काळात खूप नवं टॅलेंट मराठीत आलं. या नव्या गुणी कलावंतांना चित्रपटात काम करण्याची संधी निर्माते दिग्दर्शक देऊ पाहतायेत. वेगवेगळ्या लघुपट, अल्बम आणि जाहिरातींमधून झळकलेला असाच एक नवा चेहरा रुपेरी पडद्यावर येणार आहे. श्वेतांबरी घुटे ‘सावट’ या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात श्वेतांबरी ‘अधीरा’ ही मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे.

दक्षिणेतल्या अनेक लघुपट व जाहिरांतीसाठी श्वेतांबरी हिने काम केले आहे. त्यात तामीळ भाषेतल्या ब्लॅक तिकीट प्रोडक्शनच्या ‘रा’, अनेक महोत्सवांमध्ये पाठवलेल्या गिरीश जांभळीकर यांच्या ‘अनटायटलड साऊंडक्लिप’ सारख्या लघुपटांचा समावेश आहे. यासोबतच स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ मालिकेत व ‘घोर अंधेरा’ या अल्बममध्येही तिने काम केले आहे.

आपल्या या पदार्पणाबद्दल बोलताना श्वेतांबरी सांगते की, लघुपट आणि जाहिरातींमधून काम करायला सुरुवात केली होती मात्र एखाद्या चांगल्या व्यावसायिक चित्रपटात मला काम करण्याची इच्छा होती. हितेशा देशपांडे, स्मिता तांबे, शोबिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ या चित्रपटातून ही इच्छा पूर्ण झाली आहे. सस्पेन्सचा रंग असलेली माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्की भावेल.

Comments