महिला पोलिस अधिकारीची गाथा “तांडव” २४ मे पासून सर्वत्र...

अभिषेक प्रॉडक्शन प्रस्तुत,  सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित "तांडव" या मराठी चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबई येथे अतिशय उत्साहात पार पडली. त्यावेळी चित्रपटातील कलावंत सयाजी शिंदे, आशिष वारंग, स्मिता डोंगरे, इतर कलाकार अनिकेत के, दीपक देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

"तांडव" ह्या चित्रपटाची संकल्पना रामेश्वर गणपतराव काकडे यांची आहे. मुलींवर होणारे अन्याय अत्याचाराविरुद्ध भाष्य करणारा हा सिनेमा आहे. अन्यायाविरुद्ध मुलींना सक्षमीकरणाचे धडे देणारा हा चित्रपट आहे. प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी अगोदर जिजाऊ घडल्या पाहिजे असे भाष्य करणारा चित्रपट म्हणजे "तांडव" असे दिग्दर्शक संतोष चिमाजी जाधव, निर्माते आणि लेखक सुभाष गणपतराव काकडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकार परिषदेत म्हंटले. "तांडव" या चित्रपटासाठी एकूण २०० मुलींमधून अभिनेत्री पुजा हिची महिला पोलिस इंस्पेक्टर या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. अभिषेक प्रॉडक्शन निर्मिती संस्थेकडून पुजाला या चित्रपटासाठी फिजिकल फिटनेस, बुलेट बाईक, लाठी, काठी आणि तलवारबाजी याचे प्रशिक्षण देण्यात आले. अगदी उत्तमपणे तिने पोलीस अधिकारी, “कीर्ती मराठे पाटील” हि भूमिका साकारली आहे.

सयाजी शिंदे आपल्या भूमिकेविषयी म्हणाले की, मी या चित्रपटात एका जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भूमिका करत आहे. त्या पालकमंत्र्याला त्याच्या या पदाविषयी खूप माज असतो. त्या पदाचा तो गैरफायदा घेत लोकांवर अन्याय करत असलेला भ्रष्ट असा पालकमंत्री आहे. एकंदरीत त्यांची फारच गंमतीशीर अशी भूमिका आहे.

या चित्रपटामध्ये अरुण नलावडे एका प्रामाणिक पोलीस हवालदाराच्या भूमिकेत तर आशिष वारंग भ्रष्ट पोलीसाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्याच बरोबर स्मिता डोंगरे यांनी कीर्तीच्या आईची भूमिका दमदारपणे साकारली आहे. तर अनिकेत कांझारकर यांनी वकिलाची भूमिका केली असून कीर्तीला तिच्या संकटकाळी भक्कम पणे पाठिंबा दिलेला आहे.

रणरागिणी महिला पोलिस इंस्पेक्टर ची गाथा सांगणारा "तांडव" चित्रपट २४ मे ला प्रदर्शित होत आहे. प्रत्येक मुलींना सक्षम करणारा, मुलींना, महिलांना, अभिमान वाटणारा, तर आई - वडिलांना, भावांना, मित्रांना आणि एका आदर्श पतींना, माहिलेविषयी अभिमान असणाऱ्यांना हा चित्रपट नक्की आवडेल याची खात्री आहे.

Comments