थरारक विनोदी मराठी चित्रपट ‘भुतियापंती’च्या चित्रीकरणाला सुरुवात...

विनोदी चित्रपटांची लाट कधीच ओसरत नसली तरी थरारक, पण काहीसे गंमतीशीर चित्रपटही वरचेवर बनत असतात, जे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी होतात. प्रेक्षकही अशा चित्रपटांची आतुरतेनं वाट पाहात असतात. अशाच चित्रपटांच्या पंक्तीत विराजमान होणारा ‘भुतियापंती’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या सेवेत रूजू होण्यासाठी सज्ज होत आहे. गंमतीशीर, पण थरारक वाटावं असं शीर्षक असलेल्या ‘भुतियापंती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या घोषणेनंतर मोठया थाटात ‘भुतियापंती’चा मुहूर्त करण्यात आला. थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि विनोद बरदाडे प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्माते विनोद बरदाडे आणि सहनिर्माते नरेश चव्हाण ‘भुतियापंती’ची निर्मिती करीत आहेत. सध्या भोरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण वेगात सुरू आहे. दिग्दर्शक संचित यादव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणा-या या चित्रपटाचं टायटल पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. यापूर्वा ‘बे एके बे’ या चित्रपटाचं यशस्वी दिग्दर्शन करणा-या संचित यादव यांचा ‘भुतियापंती’ हा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट आहे.

‘भुतियापंती’ची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन विनय येरापले यांनी केलं आहे. दिग्दर्शनाकडे वळण्यापूर्वा अभिनयात आपला ठसा उमटवणारे संचित यादव या चित्रपटातही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या जोडीला यात अरूण नलावडे, कमलेश सावंत, पूर्णिमा वाव्हळ-यादव, अमित चव्हाण, तृशांत पाते, सुदेश म्हशीलकर, प्रभाकर मोरे, अंकुर वाडवे, आभा वेलणकर, संदीप जुवाटकर, मानसी संकपाळ, अमित शिंदे, समीर काळंबे, सचिन खंडागळे आदी कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. नव्या-जुन्या कलाकारांची सांगड घालत ‘भुतियापंती’च्या रूपात संचित एक असा चित्रपट बनवत आहे, जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल.

संचित यांनी दिग्दर्शन केलेल्या आपल्या पहिल्या ‘बे एके बे’ या यशस्वी चित्रपटात मनोरंजनासोबतच एक उत्तम संदेशही दिला होता. ‘भुतियापंती’ हा चित्रपटही याला अपवाद नाही. याबाबत संचित म्हणाले की, ‘भुतियापंती’ हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसून, यातील महत्त्वपूर्ण मेसेज मानवी जीवनात उपयोगी पडणारा आहे. जीवनात संघर्ष करताना आपल्या आजूबाजूला ब-याच अनाकलनीय गोष्टी घडताना दिसत असतात. अशा गोष्टींकडे आपण कोणत्या दृष्टीकोणातून पाहण्याची गरज आहे ते हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना समजेल. या चित्रपटातही गीत-संगीताची सुमधूर मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. एका सशक्त कथानकावर आधारलेल्या या चित्रपटात तितकाच दमदार अभिनय पाहायला मिळेल. याला उत्तम सादरीकरणाचीही जोड देण्यात येईल, त्यामुळे प्रेक्षकांना एक परिपूर्ण चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळेल असंही संचित म्हणाले.

येरापले यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार अभिनय जगताप यांनी स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटातील सुमधुर गीतांवर कोरिओग्राफर संतोष आंब्रे यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. लवकेश विश्वकर्मा यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, सह-दिग्दर्शकाचं काम प्रकाश तांबे यांनी पाहिलं आहे. संजीव यादव कार्यकारी निर्माता असलेल्या या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देवेंद्र तावडे यांनी केलं आहे. अतुल मर्चंडे या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक, तर धवल टेलर सहव्यवस्थापक आहेत. लवकरात लवकर या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करून पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला सुरूवात करण्याची निर्मात्यांची योजना आहे.

Comments