बॉलीवूड गायक जावेद अलीच्या हस्ते ‘व्हॉट्सॲप लव’चे संगीत अनावरण सोहळा संपन्न...

मुंबई: “मी महाराष्ट्रात राहतो आणि मुंबई माझी कर्मभूमी आहे. मी जरी दिल्लीचा असलो तरी माझ्यासकट बहुतांश कलाकारांना मोठं करण्याचं काम महाराष्ट्राने केले आहे. जगातील सर्वोत्तम गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची हिंदी आणि मराठी गाणी ऐकून मी मोठा झालो. मंगेशकर कुटुंबाच्या संगीत साधनेचा माझ्यावर प्रभाव आहे. ‘दयाघना...’, व ‘मेंदीच्या पानावर’ ही माझी आवडती मराठी गाणी आहेत. त्यामुळे मला जेव्हा जेव्हा मराठी गाणं गाण्यासाठी बोलावलं जातं तेव्हा मी खुश असतो. पण, तिथे जाण्यापूर्वी मी गीताचे संपूर्ण बोल शुद्ध उच्चारण कसे होतील, हया कडे लक्ष देतो आणि त्यासाठी मराठी गाणी आवर्जून ऐकतो. जेव्हा मी ते गाणं रेकॉर्डींगनंतर ऐकतो तेव्हा मला खुप अभिमान वाटतो की मीपण मराठी गाणं गायलंय! ह्या चित्रपटात मी ‘शोना रे’ हे सोलो साँग आणि ‘जवळ येना जरा’ हे श्रेया घोषाल सोबत ड्युएट गायलंय. आणि ह्या चित्रपटात आशाताईंनीही एक गाणं गायलंय. त्यामुळे मला खुप उत्सुकता आहे की ‘व्हॉट्सॲप लव’ बद्दल आणि हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतला आजवरचा म्युजिकल हीट ठरेल.” असे प्रख्यात गायक जावेद अली यांनी ‘व्हॉट्सॲप लव’ ह्या चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळ्यादरम्यान व्यक्त झाले.

निर्माता-दिग्दर्शक हेमंत कुमार महाले हे व्यवसायाने देश-विदेशातील भारतीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजक आहेत. त्यांचा ‘व्हॉट्सॲप लव’ हा पहिला चित्रपट असल्याने हा सिनेमा सिनेरसिकांना सांगितिक आनंद देणारा असावा, हया उद्देशाने आशा भोसले, जावेद अली, श्रेया घोषाल यासारख्या दिग्गज गायकांकडून गाणी गाऊन घेतली आहेत. संगीतकार नितीन शंकर यांनी ह्या चित्रपटाला संगीत दिले असून अजीता काळे यांनी गीतरचना केली आहे.

‘व्हॉट्सॲप लव्ह’ ह्या चित्रपटाची कथा व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडू शकते किंबहूना घडलीही असेल. चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हाला ह्याची नक्कीच खात्री होईल आणि चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण होईल. त्यामुळे प्रत्येक ‘व्हॉट्सॲप वापरणाऱ्या व्यक्तिसाठी हा सिनेमा मार्गदर्शक ठरणार आहेत.

राकेश बापट, अनुजा साठे, पर्शियन अभिनेत्री सारेह फर, पल्लवी शेट्टी, अनुप चौधरी, अनुराधा राजाध्यक्ष आदि कलाकारांनी ह्या चित्रपटात मुख्य भुमिका वठविल्या आहेत. ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कॅमेऱ्याने हा चित्रपट टीपला आहे. आणि तो मोठ्या पडद्यावर पाहणं स्वत:लाच ट्रीट देण्यासारखं आहे. तेव्हा "व्हॉट्सॲप लव" ह्या चित्रपटाचे साक्षीदार होण्यासाठी तयार राहा, 12 जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होणार.

Comments