प्रतीक्षा मुणगेकर ‘अग्निहोत्र २’ मध्ये वास्तुशास्त्रज्ञच्या भूमिकेत...

स्टार प्रवाहवर नव्याने सुरु झालेल्या ‘अग्निहोत्र २’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षरा आणि महादेव काकांसोबतच्या सीन्सनी मालिकेविषयीची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. ‘अग्निहोत्र २’ मध्ये जुन्या पात्रांसोबतच काही नवी पात्रही समोर येणार आहेत. त्यापैकीच एक नवी व्यक्तिरेखा आहे समीहा पै. अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर समीहा पै ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मालिकेत समीहा ही वास्तुशास्त्रज्ञ आहे. भारतीय संस्कृती भारताबाहेर कशी नेता येईल याच्या ती सतत प्रयत्नात असते. याआधी प्रतीक्षाने साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका अत्यंत वेगळी आहे.

या भूमिकेविषयी सांगताना प्रतीक्षा म्हणाली, ‘मला जेव्हा अग्निहोत्र २ साठी विचारलं तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता. एकतर स्टार प्रवाहसोबतची ही माझी दुसरी मालिका. याआधी छत्रीवाली मालिकेत मी एक छोटीशी भूमिका केली होती. अग्निहोत्र २ ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी संधी आहे असं मला वाटतं. समिहा बिनधास्त मुलगी आहे. मुलगी म्हणून तिला कमी लेखलेलं अजिबात आवडत नाही, आणि मुलगी म्हणून स्पेशल ट्रीटमेण्ट मिळावी हे देखिल तिला पटत नाही. तिला कासवाच्या गतीने पुढे जायला आवडत नाही. साम, दाम, दंड, भेद वापरुन गोष्ट सत्यात उतरवायची हे तिचं धोरण आहे. मालिकेतला माझा लूकही खूपच वेगळा आहे. प्रेक्षकांना समीहा ही व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.’

प्रतीक्षाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिचं बालपण मुंबईत गेलं असलं तरी पहिली ते दहावीपर्यंतच शिक्षण कोकणात झालं. नंतर पुढील शिक्षणासाठी ती मुंबईत आली आणि मुंबईचीच होऊन गेली. अभिनयाची आवड होतीच त्यामुळे अभिनयाशी निगडीत होणारे वर्कशॉप तिने अटेण्ड केले. ते करता करता तिला छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या. प्रतीक्षा ऑडिशन देत राहिली आणि नवनवी दालनं तिच्यासाठी खुली झाली. अग्निहोत्र २ मधला प्रतीक्षाचा हा नवा अंदाज पहाण्यासाठी पाहायला विसरु नका अग्निहोत्र २ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Comments