New poster unveiled of "Sarsenapati Hambirrao" movie on the occasion of "Shiv Jayanti"

शिवजयंतीनिमित्त "सरसेनापती हंबीरराव" चित्रपटाचे नवीन पोस्टर अनावरण
पुणे: लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी 'सरसेनापती हंबीरराव' या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. तिथीनुसार साजर्‍या केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहुर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या कार्यकाळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे. संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘सरेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये पिळदार शरीरयष्टी आणि रांगडा पेहराव यासोबतच हातात दुधारी तलवार (असिका) घेऊन उभे असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते अभेद्य असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाकडे पाहताना दिसत आहेत. मावळत्या सूर्याच्या साक्षीने उभे असलेले ते एखाद्या कणखर कड्याप्रमाणे भासतात. त्यांच्या हातात असलेल्या दुधारी तलवारीच्या पातीला लागलेले रक्त बघता एका झुंजार सरसेनापतीचा धगधगता इतिहास प्रेक्षकांसमोर समोर येणार हे निश्चित. 'जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा' असे लिहीलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारा अभिनेता नक्की कोण आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली असून या नव्या पोस्टरमुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा सुद्धा वाढली आहे. उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित 'सरसेनापती हंबीरराव' हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट जून २०२० मध्ये जगभरातील इतिहास अभ्यासक, शिवप्रेमी यांच्या भेटीला येणार आहे.

Comments