"FedEx" delivering critical 'COVID-19 Aid' to India

 कोविडसाठीची अत्यावश्यक सामग्री "फेडएक्स"तर्फे भारतात वितरीत

मेम्फिस, टेन: भारतातील नागरिक व आरोग्यसेवा यंत्रणा यांना कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाला तोंड द्यावे लागत असताना, जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस मालवाहतूक कंपनी, "फेडएक्स एक्सप्रेस" (फेडएक्स कॉर्पची उपकंपनी) (एनवायएसई : एफडीएक्स) जगभरातील विविध संस्थांबरोबर काम करीत असून अत्यावश्यक स्वरुपाची वैद्यकीय सामग्री व उपकरणे यांचे वितरण या संकटाच्या काळातही ठिकठिकाणी करीत आहे.

"यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम" आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पुढाकाराने 25 हजारांहून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व कन्व्हर्टर्स यांची वाहतूक करून फेडएक्स मदतकार्यामध्ये सहभागी होत आहे. या सामूहिकतेचा एक भाग म्हणून ‘फेडएक्स’ने 30 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे 1000 अत्यावश्यक ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’ची पहिली शिपमेंट पाठविली.

एका ‘फेडएक्स बोइंग 777एफ चार्टर फ्लाईट’मधून दि. 8 मे रोजी 3400 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, कन्व्हर्टर्स आणि 2,65,000 केएन95 मास्क यांची फेडएक्स कंपनी स्वखर्चाने वाहतूक करणार आहे आणि हे सामान न्यू जर्सीमधील नेवार्क येथून भारतात मुंबई येथे पोहोचविणार आहे. मुंबईतील रुग्णालयांना ही सामग्री देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, काही ग्राहक आणि ना-नफा संस्था यांच्यासोबत फेडएक्स काम करीत असून, येत्या काही आठवड्यांत भारतात शेकडो टन वैद्यकीय सामग्री व इतर सामान पोहोचविणार आहे.

"यूएस चेंबर ऑफ कॉमर्स"ने आयोजित केलेल्या ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅन्डमिक रिस्पॉन्स’ या सार्वजनिक-खासगी भागीदारी संघटनेची फेडएक्स कंपनी संस्थापक सदस्य आहे. कोविडच्या लढ्यासाठी अत्यावश्यक वस्तूंची सर्वाधिक गरज असलेल्या जगभरातील विविध ठिकाणी, सामग्री वितरीत करण्यासाठी उद्योगांना एक एकात्मिक मंच उपलब्ध करणाऱ्या ‘बिझनेस राउंडटेबल’चे पाठबळ ‘फेडएक्स’ला मिळाले आहे. या ‘ग्लोबल टास्क फोर्स’च्या सूकाणू समितीमध्ये औद्योगिक क्षेत्रांतील 17 दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे आणि ‘फेडएक्स’चे प्रेसिडेंट व सीईओ राज सुब्रम्हण्यम हे त्यांपैकी एक आहेत.

सुब्रमण्यम म्हणाले, “भारतातील विनाशकारी संकटासाठी जगभरातून दिलासा मिळण्याची गरज आहे आणि भारतीयांना होणारा त्रास कमी करण्यासाठी अत्यावश्यक सामग्रीचे वितरण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कोविडच्या साथीचा उद्रेक झाल्यापासूनच आम्ही त्याविषयी साह्य करण्यात आघाडीवर आहोत आणि आताही तातडीच्या परिस्थितीला आम्ही प्रतिसाद देत आहोत. ही साथ संपेपर्यंत फेडएक्स जीवनरक्षक औषधे, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे आणि इतर अत्यावश्यक सामग्रीचा पुरवठा करणे सुरू ठेवेल.”

‘फेडएक्स’ने कोविडसाठीच्या मानवतावादी मदतीची 10 हजारांहून अधिक शिपमेंट्स जानेवारी 2020 पासून पाठवली आहेत. जगभरातील वंचित समुदायांना ‘कोविड-19’च्या लसींचे वितरण करण्यात ‘डायरेक्ट रिलीफ’, ‘इंटरनॅशनल मेडिकल कॉर्प्स’ आदी ना-नफा तत्वावरील संघटनांना मदत करण्यासाठी मालवाहतुकीचे सहाय्य आणि 4 दशलक्ष डॉलर्सची रोख मदत देण्याची कटिबद्धता कंपनीने दर्शविली आहे.

जगभरात अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक करण्याचा ‘फेडएक्स’चा दीर्घ इतिहास आहे. कोविडचा उद्रेक झाल्यापासूनच ‘फेडएक्स’ने जगभरात 80 किलोटनपेक्षा जास्त वैयक्तिक संरक्षक उपकरणे पाठविली आहेत. त्यांत 2.2 अब्ज मास्कही होते. जागतिक लस पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘फेडएक्स’तर्फे सध्या जगभरातील 25 हून अधिक देशांमध्ये ‘कोविड-19’ची लस, संबंधित साहित्य आणि सामग्री वितरीत करण्यात येत आहे.

“भारतात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढून तेथील नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी या नागरिकांसाठी अत्यावश्यक सामग्री अतिशय तातडीने पाठवून मोलाची मदत करणाऱ्या ‘फेडएक्स’बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे शब्दांच्या पलिकडले आहे,” असे ‘डायरेक्ट रिलीफ’चे प्रेसिडेंट व सीईओ थॉमस तिघे म्हणाले. “इतर अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागत असतानाही, ‘फेडएक्स’ने आपली अद्वितीय लॉजिस्टिक क्षमता आणि आपले जागतिक सांघिक कौशल्य व शक्ती या कामासाठी समर्पित केली. कोविडची साथ आणि त्यामुळे सर्वत्र लोकांना असलेला धोका यांचा सामना करण्यासाठी सध्या आवश्यक असलेल्या नेतृत्त्वाचे आणि बांधिलकीचे हे एक उत्तम उदाहरण आहे,” असेही तिघे यांनी नमूद केले.

2023 मध्ये कंपनीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त जगातील 50 दशलक्ष लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी कंपनीच्या ‘फेडएक्स केअर्स’ने 50 बाय 50 हे ध्येय ठरविले आहे. जीवरक्षक सामग्रीचे वितरण करण्याचे कंपनीचे सध्याचे कामही या ध्येयाशी सुसंगत आहे.

‘फेडएक्स केअर्स’ "डिलिव्हिंग फॉर गुड" उपक्रमाबद्दल https://fedexcares.com/ येथे अधिक जाणून घ्या.
 

Comments